जो तो....!आणि मी
जो तो....! मी बसस्थानकावर उभा होतो, काही शाळकरी मुलांनी मला बघितले,ती मुलं माझ्या जवळ आली, आणि मोठ्या आदराने बोलू लागली, काही मुले माझ्या पाया पडू लागली.माझा हा आदर बघून इतर प्रवाशांना हायसे वाटले .मुले निघून गेली,बस आली ,मी कसाबसा बसमध्ये चढलो.कंडक्टर ,' मागे व्हा,मागे व्हा.' असे सारखे खेकसत होता, एकदोन वेळा त्याने हाताने आम्हा प्रवाशांना मागे लोटले. काही वेळापूर्वी माझा झालेला आदर आणि आताची मिळत असलेली वागणूक याविषयी मी विचार करु लागलो.
'अतिपरिचय अवज्ञा ' प्रमाणे, ' अपरिचय अवज्ञा ' असे नवे सुभाषित तयार करण्याचा मला मोह झाला.खरेच , आपल्या ओळखीला मर्यादा आहेत.अनोळखी ठिकाणी तशी वागणूक आपणास मिळणार नसते, हे वास्तव नाकारता येत नाही, पुन्हा ज्या त्या ठिकाणी ज्याचे त्याचे अधिकार किंवा वर्चस्व असते.लहान सहान कामे करणारी माणसे देखील आपला हिसका दाखवतात,वेठीस धरतात, पिळवणूक करतात. एखाद्या आफिस मध्ये तुमचा आदेश चालतो , म्हणजे तो सर्वच ठिकाणी चालतो असे नाही.कित्येक फडतूस लोक देखील भाव मारतात.गल्ली बोळातले दादा , इतरत्र मार खातात,कारण तिथे तिथलेही दादा असतात.रस्त्याने एखादा महाराज चाललेला असतो, गर्दीतून जातो , परंतु कुणी त्यास विचारत नाही, परंतु त्यास ओळखणारे,त्याचे भक्त पटपट पाय पडतात.
ज्यांना हारतुरे घातले जातात, त्यांना अनोळखी लोक धक्काबुक्की करतात.प्रत्येक ठिकाणी लोक आपणास महत्व देऊ शकत नाही.अनोळखी लोकांच्या आपण खिजगणतीतही नसतो.'मला ओळखत नाही का?' हा प्रश्न मोठा केविलवाणा असतो.उत्तर जर , नाही असे आले तर नामुष्की होते.कित्येक नामवंत लोकांची अनोळखी लोकांकडून उपेक्षा किंवा अवहेलना झालेली आहे.
आपल्याकडे ओळखी नुसार वागणूक मिळते.जिथे ओळख नाही, तिथे कशी वागणूक मिळेल सांगता येत नाही. आपण कुणीही असलो तरी बसमध्ये बसलो की त्या ड्रायव्हरच्या मर्जीने बस चालते.दवाखान्यात गेले की डाक्टरचे ऐकावे लागते.चौकात पोलिसांनी हात दिला की गाडी थांबवावी लागते. जिथे तिथे ज्याचा त्याचा अधिकार असतो आणि जो तो आपल्या मर्जीने काम करतो.कुत्रा मालकाच्या दारासमोर कुणी आले की भूंकतो.बसमध्ये जागा असताना बस न थांबवण्याचे प्रकार होतात.रिक्शावाले असो, की हमाल आपला हेका सोडत नाही.जो तो आपल्या ठिकाणी अडवणूक करतो, मुजोरी करतो, मनमानी करतो.
गरज आहे ती प्रत्येकाशी सौजन्याने वागण्याची, तिथे ओळखीला महत्व न देता, त्याच्या सेवेला महत्व दिले पाहिजे.आपण कोणत्याही ठिकाणी असू , कोणतेही काम करत असू , ते काम उत्तम आणि चोखपणे पार पाडले पाहिजे, तिथे मनमानी न करता,छळ न करता, तत्परतेने ते केले पाहिजे.
- ना.रा.खराद, अंबड


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा